इराणकडून होर्मुझची नाकेबंदी; ट्रम्प यांच्या ‘टोल’ प्रस्तावामुळे तेल बाजारात खळबळ

वॉशिंग्टन/तेहरान :
इस्रायलकडून लेबनॉनवर करण्यात आलेल्या ताज्या लष्करी हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या या आक्रमक पाऊलामुळे काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या तात्पुरत्या शांततेच्या कराराला केराची टोपली दाखवण्यात आली असून, यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
इराणच्या आयआरजीसी (IRGC) चा आक्रमक इशारा
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने लेबनॉनमधील इस्रायली हल्ले आणि अमेरिकेकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला आहे. आयआरजीसीने आक्रमक भूमिका घेत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक थांबवली असून, आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना या मार्गावरून प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. “या मार्गाने वाहतूक करणे टाळा, आणि प्रवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर येथून वाहतूक करावी,” असे इराणने स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा ‘टोल’ प्रस्ताव
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मुझ बंद केल्याच्या संवेदनशील बाबीकडे दुर्लक्ष करत एक नवा आणि धक्कादायक प्रस्ताव मांडला आहे. ट्रम्प यांनी थेट होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याचे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील ६० दिवसांच्या शस्त्रसंधीच्या कालावधीत होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर कोणताही टोल आकारला जाणार नाही. परंतु, जर हा शांतता करार पूर्णपणे अयशस्वी ठरला, तर भविष्यात अमेरिका या मार्गावर टोल वसुली करू शकते.
मध्य पूर्वेतील देशांच्या झालेल्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी ही टोल वसुली केली जाईल, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, इराणने हा मार्ग बंद केल्याबद्दल त्यांनी थेट कोणतेही भाष्य केलेले नाही.
जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि तेलाच्या किमतींवर संकट
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी तब्बल २०% पुरवठा करणारा मुख्य सागरी मार्ग आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे जग आधीच मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. अशातच आता हा मार्ग पुन्हा बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती प्रचंड भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव तर वाढला आहेच, शिवाय जागतिक स्तरावर महागाईचा भडका उडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.



