पुणे शहर

मित्राची हत्या करून पळालेल्या आरोपीला वाघोली पोलिसांची ६ तासांत बेड्या; तांत्रिक विश्लेषणातून अवघ्या काही तासांत तपास पूर्ण

पूजा जमदाडे/पुणे : मित्राची हत्या करून फरारी झालेल्या परराज्यातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अवघ्या ६ तासांत जेरबंद केले आहे. वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

मांजरी खुर्द येथील सिन्ना अंकल यांच्या फार्म हाऊसवर काही कामगार सेंट्रिंगचे काम करत होते. यातील मयत शिवशंकर मोहनमाड सिंह (वय ४७) आणि आरोपी सुरज अमृत साव (वय ३५) हे दोघेही मित्र होते. १ जुलै २०२६ रोजी दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, आरोपी सुरज साव याने लोखंडी हातोडा आणि पडदे लावण्याच्या लोखंडी पाईपने शिवशंकर यांच्या डोक्यावर, तोंडावर व कपाळावर वार करून त्यांची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी सुरज साव हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला. त्यानंतर पोलीस पथकाने सातारा गाठून तेथील एका कन्स्ट्रक्शन साईटवरून आरोपी सुरज साव याला शिताफीने ताब्यात घेतले.

ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व त्यांच्या तपास पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक शहदेव हवाले करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page