मुंबई

महाराष्ट्राची राजकीय प्रतिमा डागाळू नका, बेफाम वागणाऱ्यांचे राजीनामे घ्या!’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; राजकीय वर्तुळात खळबळ

विशेष प्रतिनिधी / मुंबई : केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये वाढलेला सत्तेचा माज आणि काही लोकप्रतिनिधींकडून दाखवली जाणारी कमालीची असंवेदनशीलता यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसणाऱ्या आमदारांवर कारवाई का होत नाही? तुमच्या या मौनाचे नेमकं कारण काय?” असा थेट आणि तिखट सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे विचारला असून, चुकीचे वागणाऱ्या नेत्यांचे तात्काळ राजीनामे घेण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राज ठाकरे यांनी पत्राची सुरुवातच अतिशय आक्रमकपणे केली आहे. “भाजपच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, असे देशातील लोक सर्रास बोलत आहेत. हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे आणि तुम्ही तो पसरू देत आहात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणाला वैचारिक आणि सुसंस्कृत वारसा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय, हे आता स्पष्टपणे जाणवत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली.

Absolute Power Corrupts Absolutely’

पत्रात एका प्रसिद्ध विधानाचा हवाला देत राज ठाकरेंनी टोला लगावला की, “‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ या वाक्याचा अर्थ जर उद्या कुणाला समजून सांगायची वेळ आली, तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे त्याचे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” कोणाला कशाचाच खेद किंवा खंत उरलेली नाही, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब, पवार, महाजनांचा दिला दाखला

देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत असे संपूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्यालाही वाटत होते, अशी आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, “जेव्हा असे गंभीर प्रकार घडतात आणि तुमच्याकडून साधा खेदही व्यक्त केला जात नाही, तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली ३७ वर्षे राजकारणात सक्रिय आहे. या काळात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी स्वपक्षाचा माणूस असला तरी त्याच्या चुकांवर कधी पांघरूण घातले नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची देशभर एक वेगळी प्रतिमा होती.”

‘स्वकीयांच्या चुका पाठीशी घालणारे भाऊ’ अशी प्रतिमा होईल!

“आज तुम्ही हा ‘आपला माणूस’ आहे ना, मग त्याने काहीही केले तरी त्याला पाठीशी घालण्याचे धोरण सुरू केले आहे. तुमचे मंत्री आणि नेते रोज बेताल विधाने करत असून उघडपणे असंवेदनशीलता दाखवत आहेत. तुम्ही जर त्यांना समज दिली असती, तर त्यांची पुन्हा तीच चूक करायची हिंमत झाली नसती,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या मौनावर बोट ठेवले. तसेच, “अपेक्षाभंग करू नका, अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे यांनी पत्रात केलेल्या प्रमुख मागण्या

◼️कडक शासनाची गरज: वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.

◼️राजीनाम्याची मागणी: अशा बेफाम आणि असंवेदनशील लोकप्रतिनिधींकडून तात्काळ राजीनामे घेतले पाहिजेत.

प्रतिमेची काळजी: स्वकीयांच्या चुका पाठीशी घालून महाराष्ट्राची आणि स्वतःची सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा डागाळू नका.

राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर आता भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page