पुणे शहर

धनकवडीत अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका; पुण्यात अनिल लोंढेच्या ‘ऑनलाईन’ सेक्स रॅकेटचा विळखा

विशेष प्रतिनिधी / पुणे : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने धनकवडी परिसरात केलेल्या धडक कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, तिच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला, धनकवडीतील सर्वे नं. ३६/१, सद्गुरु कृपा बिल्डिंग, वनराई कॉलनी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सुप्रिया बाळासाहेब चांदने (वय २८, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) या महिला आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १४३(१)(२), ३५१(२), अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४, १७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नगर रोडवरील ‘गुप्त’ अड्ड्यांची साखळी आणि संशयास्पद कारभार

एकीकडे गुन्हे शाखा कारवाई करत असताना, दुसरीकडे पुणे नगर रोडवरील काही लॉजिंगमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे ‘गुप्त वेश्यालय’ चालवले जात असल्याचे समोर येत आहे. यातीलच एका ‘भवानी’ नावाच्या हॉटेलवर यापूर्वी अनेकदा कारवाया झाल्या असून, तिथे परदेशी (बांगलादेशी) तरुणीही मिळून आल्या होत्या. असे असूनही, कायद्याला न जुमानता येथे पुन्हा हा गोरखधंदा सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारभाराचा ‘वसंत’ एका विशिष्ट ध्येयाने बहरला असून, त्याचा कारभारी असलेला एक ‘टक्कल असलेला हैवान’ आपल्या गुंडांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था सांभाळतो. हॉटेलच्या खाली तैनात असलेला पहारेकरी ग्राहकाची खात्री करून आणि बाहेरून गुप्त संदेश मिळाल्यावरच कुलूप लावलेले शटर उघडतो. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी वापरली जाणारी ही ‘हाय-टेक’ गुप्तगिरी आणि या ‘वसंत’ ऋतूची ही संशयास्पद बहरलेली दुनिया पाहता, आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा ‘दिमाग’ लावणाऱ्यांना स्वतःच्या स्टाईलने धडा शिकवण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

अनिल लोंढेच्या ‘ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिस’वर पोलीस आयुक्तांचा हातोडा कधी?

धनकवडीतील या कारवाईने शहरात खळबळ उडाली असतानाच, आता पुण्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येरवडा, विमाननगर, चंदननगर, खराडी आणि वाघोली परिसरात अनिल लोंढे नावाचा दलाल सक्रिय असून, तो मोठ्या प्रमाणावर ‘ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिस’ चालवत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या दलालाने आपले जाळे इतके विस्तारले आहे की, खराडी परिसरातील एका हायप्रोफाइल सोसायटीत तरुणींना ठेवून, त्यांना पुणे नगर रोडवरील अनेक हॉटेल आणि लॉजिंगमध्ये ऑनलाईन पद्धतीने पुरवले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनिल लोंढेने काही ‘वसुलीदादांना’ हाताशी धरून आपली ही एस्कॉर्ट सर्व्हिसची साखळी अधिक गतिशील केली आहे.

मोठ्या माशांवर कारवाई का नाही?

शहरात पोलिसांकडून छोट्या दलालांवर कारवाई केली जाते, परंतु अशा प्रकारे जाळे पसरवून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या अनिल लोंढेसारख्या ‘मोठ्या माशांवर’ कारवाई का होत नाही? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. या रॅकेटमुळे परिसरातील सामाजिक वातावरण धोक्यात आले असून, धनकवडीनंतर आता अनिल लोंढेच्या या अवैध धंद्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कधी धडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page