राष्ट्रीय

पारोळा: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकरचा स्फोट होऊन चालक-क्लिनर जळून खाक

पारोळा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला. टायर फुटल्यामुळे भरधाव केमिकल टँकरचे नियंत्रण सुटून त्याने टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर टँकरने अचानक पेट घेतल्याने टँकरमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने एक केमिकल टँकर जात होता. दरम्यान, सबगव्हाण टोलनाक्याजवळ अचानक टँकरचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला टँकर थेट टोलनाक्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडकून आदळला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, काही क्षणातच केमिकल टँकरच्या पुढील भागाने पेट घेतला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. केमिकलमुळे आग अधिक भडकू नये म्हणून फोमचा वापर करण्यात आला. पारोळा नगरपालिकेसह धुळे येथूनही अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने, आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे केमिकल गळती होऊन मोठा अनर्थ टळला.

अपघाताची तीव्रता मोठी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धुळे आणि पारोळा या दोन्ही दिशांकडील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात टोलनाक्याचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पारोळा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page