महर्षी कर्वेंची स्त्री शिक्षणाची परंपरा एसएनडीटीने केली समृद्ध; ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ चा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : स्त्री शिक्षणाचे प्रणेते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लावलेला शिक्षणाचा रोपट आज वटवृक्ष बनले आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त, महर्षींच्या पुतळ्याचे अनावरण करत या महान परंपरेचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ चे उद्घाटन करण्यात आले, ज्यातून भविष्यातील महिला नेतृत्वाचे नवे दालन उघडले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ मध्ये विद्यार्थिनींनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देऊन राज्यपालांनी विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे कौतुक केले. राज्यपाल म्हणाले, “केवळ पदव्या मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानात्मक क्षेत्रांत संशोधनावर भर देऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान देणे ही काळाची गरज आहे.”
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करत एसएनडीटी विद्यापीठ आता जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, उद्योग, शासन आणि स्टार्टअप यांना एकत्र आणणारी एक भक्कम परिसंस्था (Ecosystem) आम्ही उभारत आहोत, ज्यामुळे विद्यार्थिनींचे कौशल्य थेट रोजगाराशी जोडले जाईल.
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
एकीकडे महर्षी कर्वे यांचा पुतळा त्यांच्या त्यागाची आठवण करून देत होता, तर दुसरीकडे ‘इनोव्हेशन महाकुंभ’मधील आधुनिक स्टार्ट-अप्सची ऊर्जा विद्यापीठाच्या बदलाचे दर्शन घडवत होती. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या विद्यापीठाने आता संशोधनाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवण्याचा निर्धार केला आहे.



