महाराष्ट्र

इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; ९ जण गजाआड

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी केवळ मारहाणच केली नाही, तर तब्बल १० ते १२ किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली. या गंभीर प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत ९ संशयितांना ताब्यात घेतले असून, यात एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे.

रविवारी नाशिकमधील एक कुटुंब भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही स्थानिक टवाळखोरांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. एका महिलेची छेड काढल्याचा जाब विचारला असता, संशयितांनी कुटुंबाला धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे घाबरलेले कुटुंब तातडीने आपल्या मोटारीतून तिथून निघाले. मात्र, संशयितांनी १० ते १२ किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि रस्त्यात गाडी अडवून काचा फोडल्या. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर, भेदरलेले कुटुंब थेट नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथून हा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

या कारवाईबाबत माहिती देताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, तांत्रिक विश्लेषण आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास करून आतापर्यंत नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व संशयित इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, बलायदुरी, देवळे घोटी, माणिक खांब आणि गिरणारे या परिसरातील रहिवासी आहेत. अटकेतील एका आरोपीवर २०२० मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे. तसेच, आरोपींना आश्रय देणाऱ्या व पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरण परिसरात शिट्टी वाजवण्यावरून पर्यटकांचा स्थानिकांशी पहिल्यांदा वाद झाला होता. तिथे पोलीस चौकी आणि बंदोबस्त असूनही, हा वाद नंतर गंभीर वळण घेत सात ते आठ किलोमीटर अंतरावर पोहोचला. तिथे आरोपींनी कुटुंबाच्या गाडीवर हल्ला केला. दरम्यान, पोलिसांच्या ११२ क्रमांकाच्या गाडीने तक्रारदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु भीतीपोटी कुटुंबीय वेगात गाडी चालवत थेट अंबड पोलिसांपर्यंत पोहोचले होते.

या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दरोडा आणि विनयभंग यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके भिवंडी आणि वाडा परिसरात रवाना झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page