पुणे शहर

मोशी कचरा डेपो दुर्घटना: ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटना प्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत ९ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी दोषी ठरवत संबंधित कंपनीच्या प्रकल्प प्रमुखांसह सुरक्षा अधिकाऱ्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपोमधील ‘एसएलएफ’चा (SLF) काही भाग अचानक ढासळला. हा कचऱ्याचा ढिगारा बाजूला असलेल्या इमारतीवर आणि रस्त्यावर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली २३ जण अडकले होते. माहिती मिळताच प्रशासनाने तीन दिवस मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवले. या बचावकार्यात १४ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र दुर्दैवाने ९ कामगारांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी सोहन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ या कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसएलएफ (SLF) सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे होते, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका कंपनीच्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. याच निष्काळजीपणामुळे ही जीवघेणी दुर्घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली, तरी दुसरीकडे या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना अभय दिले जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, याचाही छडा लावला जाणार आहे.

या दुर्घटनेनंतर मोशी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाकडून दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page