मुंबई

भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी तुकाराम मुंढेंचा नवा मंत्र: समाजाकडे कुटुंब म्हणून पाहा, जबाबदारी स्वीकारा!

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे तुकाराम मुंढे सध्या भेसळखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, केवळ प्रशासनाच्या कारवाईवर अवलंबून न राहता, भेसळमुक्तीसाठी आता नागरिकांनीच ‘चळवळ’ उभी करण्याची गरज असल्याचे परखड मत त्यांनी एका वृत वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.

शाळांच्या ५०० मीटर परिघात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याच्या विषयावर भाष्य करताना मुंढे यांनी समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “सध्याची स्थिती अशी आहे की, प्रत्येकाला वाटते की जबाबदारी दुसऱ्याची आहे. जणू काही ‘शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात’ अशी ही मानसिकता झाली आहे. पालक शाळेकडे बोट दाखवतात, शाळा प्रशासनाकडे, आणि प्रशासन एफडीएकडे. पण भेसळयुक्त अन्न खाणारे आपल्याच घरातील मुले आहेत, हे आपण विसरतो.”

शाळांच्या ५०० मीटर परिसरात अस्वास्थ्यकर पदार्थांची विक्री रोखणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, जर पालकांनी किंवा शिक्षकांनी तक्रार केली, तर एफडीए नक्कीच कारवाई करेल. पण, प्रत्येक गल्लीत आणि शाळेत अधिकारी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक, पालक समिती आणि शिक्षकांनी मिळून हे प्रकार थांबवले पाहिजेत.

आपल्या कुटुंबाची जबाबदारी जशी आपण घेतो, तशीच जबाबदारी जर प्रत्येक नागरिकाने समाजाची घेतली, तर भेसळयुक्त पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद होऊ शकते, असा विश्वास मुंढेंनी व्यक्त केला. “आपण काय खातो, याकडे केवळ लक्ष न देता कटाक्षाने पाहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने जर ही जबाबदारी स्वतःची मानली, तर संपूर्ण समाज आरोग्यदायी होईल,” असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page