पुणे शहर

शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; पुण्याच्या ‘मास्टरमाईंड’च्या मुसक्या आवळणार!

धुळे/पुणे : राज्यातील बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या तपासात आता रोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून आता थेट ‘पुणे कनेक्शन’ समोर आले असून, या घोटाळ्याचा खरा ‘मास्टरमाईंड’ पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाडिलेच्या जबाबावरून आता पुण्यातील एका बड्या शिक्षण संस्था चालकाच्या अटकेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा घोटाळा केवळ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारपुरता मर्यादित नसून, त्याचे केंद्र पुणे असल्याचे तपासात उघड झाले आहे. शिक्षण विभागाचे महत्त्वाचे कामकाज आणि या संपूर्ण घोटाळ्याची मुख्य सूत्रे पुण्यातूनच हलवली जात होती. वाडिले याने नेमकी किती शिक्षकांची भरती केली आणि कोणत्या शिक्षण संस्थांना बनावट प्रस्तावांद्वारे मान्यता मिळवून दिली, याची सखोल चौकशी आता केली जाणार आहे. वाडिलेच्या अटकेनंतर संबंधित अनेक शिक्षण संस्था चालकांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अटकेत असलेला वाडिले याने प्रत्येक बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून देण्यासाठी २० ते २५ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ६० टक्के रक्कम तो संबंधित अधिकाऱ्यांना देत असे. याशिवाय, शिक्षकांची वैद्यकीय बिले मंजूर करणे आणि वेतनाचा फरक काढून देण्यासाठी तो ५० टक्के ‘कमिशन’ घेत असे. यातून त्याने मोठी माया जमवली असून, त्याची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही थक्क झाल्या आहेत. सध्या वाडिलेच्या बँक खात्यांची कसून चौकशी सुरू आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. दरम्यान, वाडिलेच्या चालकाचीही चौकशी करण्यात आली असून, त्याच्याकडील मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. लवकरच पुण्यातील या ‘बड्या माशा’च्या अटकेनंतर घोटाळ्यातील अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page