कोल्हापूर हादरले! ‘मुलगी झाली’ म्हणून छळ, माहेरून पैसे-सोन्याची मागणी; विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांना बेड्या

कोल्हापूर : पैशांची हाव आणि ‘मुलगाच हवा’ या अघोरी मानसिकतेने पुन्हा एकदा एका निष्पाप विवाहितेचा बळी घेतला आहे. कोल्हापुरातील सायबर चौकातील काटकर मळ्यामध्ये अस्मिता प्रतीकसिंग काटकर (वय २९) हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर शहर हादरले असून, पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली आहे.
अस्मिता आणि प्रतीकसिंग काटकर यांचा विवाह २६ नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापुरातील एका आलिशान हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. अस्मिताच्या आईने, संगीता अजित सरदेसाई यांनी आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी लग्नात ९ तोळे सोने आणि ५ लाख रुपयांचा संसारसेट दिला होता. मात्र, सासरच्या मंडळींची हाव एवढ्यावरच थांबली नाही.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांच्या लग्नात अस्मिताने पतीसोबत डान्स केला नाही, या किरकोळ कारणावरून तिचा छळ सुरू झाला. अस्मिताने एका गोंडस चिमुरडीला जन्म दिल्यावर सासरच्यांनी तिचा आनंद साजरा करण्याऐवजी, ‘मुलगी का झाली?’ अशी विचारणा करत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. “माहेरून आणखी ५ तोळे सोने आणि ५ लाख रुपये रोख आण,” अशी मागणी करत पती प्रतीकसिंग वीरेंद्रसिंग काटकर (वय ३०), सासरे वीरेंद्रसिंग विलासराव काटकर (वय ५८), सासू मनीषा (वय ५१) आणि नणंद ऋतुजा (वय २५) हे चौघेही तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.
अस्मिताचा हा छळ असह्य झाल्यामुळेच तिने आपले जीवन संपवल्याचे निष्पन्न झाले आहे. अस्मिताच्या आई संगीता सरदेसाई यांनी, “माझ्या निष्पाप मुलीचा खून झाला असून, संशयितांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे आता पोलिस या प्रकरणाचा ‘खुनाच्या’ शक्यतेनेही तपास करत आहेत.
राजरामपुरी पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद या चौघांना अटक केली असून, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संशयितांच्या विधानांची पडताळणी करत आहेत. तसेच, घराचे आणि परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून मंगल कार्यालयांकडेही चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतरचा ‘विसेरा’ अहवाल आल्यावर मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. अवघ्या २९ व्या वर्षी झालेला अस्मिताचा मृत्यू आणि तिने मागे सोडलेले एक महिन्याचे बाळ यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



