पुणे शहर

स्विफ्ट कार व बहिणीच्या लग्नासाठी तरुणांचा गुन्हेगारीकडे प्रवास; लक्ष्मीनगर पोलिसांकडून ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

पुणे : लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बुलेट, केटीएम सारख्या महागड्या मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ५ लाख रुपये किमतीच्या एकूण ८ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तपास पथकाला पेट्रोलिंग वाढवून संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. १२ जुलै २०२६ रोजी दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना, तपास पथकातील अंमलदार सुरज ओंबासे आणि अमोल वायाळ यांनी पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील ५० किलोमीटर परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली.

या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवून, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून खालील दोन आरोपींना तारकेश्वर टेकडीजवळ ताब्यात घेतले.

१) सागर संजय शेळके (वय १९, रा. कारेगाव, मूळ रा. कर्जत, जि. अहिल्यानगर)

२) करण अदिराज धुमाळ (वय २३, रा. कारेगाव, मूळ रा. परळी, जि. बीड)

पैशांच्या हव्यासापायी गुन्हेगारीचा मार्ग

आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी कबूल केले की, सागर शेळके याला ‘स्विफ्ट’ कार खरेदी करायची होती, तर करण धुमाळ याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. या कारणांमुळे त्यांनी मोटारसायकल चोरीचा मार्ग निवडला.

८ गुन्हे उघडकीस

या कारवाईमुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकूण ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील ३, खराडीतील २, तर वाघोली, निगडी आणि दापोडी येथील प्रत्येकी १ गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीनाथ कांबळे करत आहेत.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page