वृक्षारोपण संकल्प २०२६’: पुणे जिल्हा हरित करण्याचा रामानंद संप्रदायाचा निर्धार

पुणे : जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून, ‘रामानंद संप्रदाय’ आणि ‘पुणे जिल्हा सेवा समिती’ यांच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. “वृक्षारोपण संकल्प २०२६” अंतर्गत, उद्या गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ‘आढळे बुद्रुक’ येथे एकाच दिवसात तब्बल १०,००० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’. या अभंगानुसार, वृक्ष हेच आपले खरे नातेवाईक आहेत, हे ओळखून रामानंद संप्रदायाने वृक्षसंवर्धनाचा हा यज्ञ हाती घेतला आहे. केवळ वृक्ष लावून न थांबता, त्यांचे रक्षण करणे हेच खऱ्या अर्थाने निसर्गाप्रती असलेल्या ऋणातून मुक्त होण्याचे साधन आहे. निसर्गाशी नाते जोडून त्याला समृद्ध करण्याचा हा पवित्र संकल्प खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी आहे.
या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात प्रभूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि वृक्षपूजन करून केली जाणार आहे. रामानंद संप्रदायाने केवळ या दिवसाचे नियोजन केले आहे असे नाही, तर गेल्या ८ दिवसांत पुणे जिल्ह्यात २०,००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ६ दिवसांत १,१८,००० पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करून संस्थेने एक आदर्श निर्माण केला आहे.
केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही संस्थेमार्फत पार पाडली जाणार आहे. पुणे जिल्हा हरित करण्यासाठी हाती घेतलेल्या या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत.
रामानंद संप्रदायामार्फत अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात विनामूल्य उपक्रम राबविले जात असून, या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन नानाभाऊ जोशी यांनी दिली आहे



