मोठी कारवाई: आंबेगाव-नवले पूल परिसरातील २ लॉजवर छापा, ९ पीडित महिलांची सुटका तर २ आरोपींना अटक

पुणे (प्रतिनिधी) :पुण्यातील नवले पूल आणि आंबेगाव बुद्रुक परिसरात उघडपणे सुरू असलेल्या देहविक्रीच्या काळ्या धंद्यावर पुणे पोलीस गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. ‘अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षा’च्या पथकाने साई किरण आणि गॅलेक्सी लॉजवर अचानक छापा टाकून तब्बल ९ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे. या कारवाईमुळे देहविक्रीचा व्यापार चालवणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.
बनावट ग्राहक पाठवून रचला जाळा
मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आधी बनावट ग्राहक पाठवून बातमीची पक्की खात्री केली. बनावट ग्राहकाचा सिग्नल मिळताच पोलिसांनी साई किरण आणि गॅलेक्सी लॉजवर जोरदार छापा टाकला. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ९ महिलांची सुटका करण्यात आली.
रिक्षाचालक आणि लॉज मॅनेजरला बेड्या
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत: १. राकेश राजू पाटोळे (वय २७, धंदा: रिक्षा चालक, रा. धायरी, पुणे), २. मंगेश व्यंकट बनसोडे (धंदा: लॉज मॅनेजर, रा. आंबेगाव, मूळ रा. धाराशिव)
या आरोपींविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते आणि पोलीस उप-आयुक्त श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.



