नवी दिल्ली

दिल्लीत एनएसएचा बडगा; पोलिस आयुक्तांना थेट नजरकैदेचे विशेषाधिकार!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर प्रशासनाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्लीतील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) दिल्लीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांना कोणत्याही संशयित व्यक्तीला थेट प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्याचे विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. दिल्लीच्या अधिकृत राजपत्रात यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही अंमलबजावणी १९ जुलै ते १८ ऑक्टोबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, राज्य सुरक्षेला बाधा आणणारे कृत्य किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना तात्काळ विनाखटला नजरकैदेत ठेवण्याची तरतूद आहे. दिल्ली सरकारच्या गृह विभागाचे उपसचिव रमेश कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, हा आदेश एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असून, याचा चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी थेट संबंध नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिस दलाने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आगामी सर्व सुट्या तात्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत. इंटरनेट सेवांवर आधीच निर्बंध आणले गेलेले असताना, आता पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजधानीतील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page