तेजसच्या विलंबाचा वायुसेनेच्या क्षमतेवर परिणाम; एअर चीफ ए. पी. सिंह यांची चिंता

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन
नवी दिल्ली : तेजस लढाऊ विमानांच्या वायुसेनेतील समावेशाला होत असलेला विलंब भारतीय वायुसेनेच्या क्षमतेवर परिणाम करत असल्याचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी स्पष्ट केले. वायुसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लढाऊ विमानांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.
सध्या वायुसेनेकडे २९ लढाऊ स्क्वॉड्रन आहेत, तर मंजूर संख्या ४२ स्क्वॉड्रनची आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी पुढील काही वर्षांत दरवर्षी ३६ ते ४० नवीन लढाऊ विमाने वायुसेनेत दाखल होणे आवश्यक असल्याचे ए. पी. सिंह यांनी सांगितले.
तेजस एमके-१एच्या पुरवठ्यात अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला असून, त्याचा वायुसेनेला फटका बसत असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. २०२१ मध्ये ८३ तेजस एमके-१ए विमानांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता; त्यानंतर आणखी ९७ विमानांसाठीही करार करण्यात आला. मात्र पहिल्या करारातील विमानांचा पुरवठाही अद्याप अपेक्षित गतीने झालेला नाही.
वायुसेनेची घटती लढाऊ क्षमता भरून काढण्यासाठी तेजस एमके-१एबरोबरच बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेलाही वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेतून ११४ लढाऊ विमाने घेण्याचा प्रस्ताव असून, चालू आर्थिक वर्षात करार अंतिम करण्याचे लक्ष्य असल्याचे ए. पी. सिंह यांनी सांगितले.
वायुसेनेची लढाऊ विमानांची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी देशांतर्गत उत्पादनाचा वेग आणि नव्या विमानांची वेळेत उपलब्धता निर्णायक ठरणार आहे.



