गुन्हेगारीमहाराष्ट्रराजकारण

माजी आमदार गोपाळदास अग्रवाल मारहाण प्रकरण: भाजप नगरसेवकासह दोघांना ५ वर्षांची सक्तमजुरी, ५० हजारांचा दंड!

गोंदिया : काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांच्यावर झालेल्या प्रसिद्ध मारहाण प्रकरणाचा अखेर ९ वर्षांनंतर निकाल लागला आहे. या खळबळजनक प्रकरणात भाजप नगरसेवक शिवकुमार शर्मा आणि राहुल हेमराज श्रीवास यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. प्रतिनिधी यांनी या दोघांना अनुक्रमे ५ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे. तर, पुराव्याभावी इतर ५ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ही ऐतिहासिक सुनावणी गुरुवारी (२५ जून) पार पडली.

पत्रकार परिषदेत घुसून केला होता हल्ला

हे संपूर्ण प्रकरण ९ एप्रिल २०१६ रोजी घडले होते. कुडवा येथील हॉटेल ‘ग्रँडसीता’ येथे माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस पक्षातर्फे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करत होते. या दरम्यान नगरसेवक शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास यांनी तिथे येऊन जुन्या वादातून माजी आमदार गोपालदास अग्रवाल, त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल आणि उपस्थित इतर लोकांना बेदम मारहाण केली व तिथून पळ काढला होता. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

‘कलम ३०७’ अंतर्गत गुन्हा दाखल, असा झाला तपास

रामनगर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून शिवकुमार शर्मा यांच्यासह ६ जणांविरुद्ध भादंवि (IPC) कलम ३०७ (धाकदपटशा/जीवे मारण्याचा प्रयत्न), १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे), ३२४, ३२७, २९४, ५०५, २१२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रामनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार ताईतवाले यांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला, तर तत्कालीन पोलिस निरीक्षक नन्नावरे यांनी संपूर्ण तपास चक्र फिरवून न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले होते.

आरोपीला शेवटपर्यंत मिळाला नाही जामीन

या प्रकरणात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यामुळे मुख्य आरोपी शिवकुमार शर्मा यांना शेवटपर्यंत जामीन मिळाला नव्हता. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी होऊ शकली नाही, अखेर शर्मा यांनी स्वतःहून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर होऊन अटक पत्करली होती. मागील ५ दिवसांपासून या प्रकरणाची न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होती.

विशेष सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद

गोपालदास अग्रवाल यांच्या मागणीवरून शासनाने या प्रकरणात नागपूरचे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. पी. के. सत्यनाथन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांना सरकारी वकील पुरुषोत्तम आगाशे यांनीही मदत केली. २५ जून रोजी दुपारी ४ वाजता न्यायाधीश ए. एस. प्रतिनिधी यांच्यासमोर अंतिम सुनावणी सुरू झाली. यावेळी अॅड. सत्यनाथन नागपूरहून व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीने हजर होते. आरोपींचे मुख्य वकील प्रकाश तोलानी हे मुंबईला गेले असल्याने, त्यांच्या सहकारी वकिलांनी न्यायालयात आरोपींची शिक्षा कमी करण्यासाठी युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य पाहत कडक शिक्षा सुनावली.

५ आरोपींची निर्दोष मुक्तता; दोषींची भंडारा कारागृहात रवानगी

या खटल्यात न्यायालयाने अनिमेष ऊर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे, गजेंद्र रामचरण सते, परवेज पटेल, परवेज खान आणि जगजितसिंग ऊर्फ बिट्टू प्रितमसिंग भाटिया या ५ जणांना निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाने शिक्षा सुनावताच कोर्ट परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास यांना ताब्यात घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, गुरुवारी उशिरा रात्री त्यांची भंडारा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. राजकीय क्षेत्रात या निकालाची प्रचंड चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page