मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार देवेंद्र फडणवीसच

पाच वर्षांपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जनतेने दिलेला कौल नाकारला आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आश्चर्य असे की सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेल्या काँग्रेसने या कथित आघाडीमध्ये काही मंत्रिपदे मिळावीत म्हणून झोकून दिले. केवळ सत्ता हाती यावी म्हणून ती आघाडी झाली होती. त्यात देखील त्या वेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी भयंकर पुढाकार घेतला. त्यातील मुख्य सूत्र असे होते की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही. ‘फडणवीस नको या दोन अक्षरी अभियानाने सुरू झालेली महा विकास यात्रा आता नुकत्याच लागलेल्या निकालांमुळे महाभकास झाली. याचे श्रेय सर्वस्वी ‘फडणवीस नको’ चळवळ चालवणारे शरद पवार ,संजय राऊत,उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या वाचाळ सहकाऱ्यांना जाते.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे भाजपपासून वेगळे झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यापासून वंचित राहिले. नंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अनिच्छा असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. निवडणुकीदरम्यान त्यांनी आपण उपमुख्यमंत्री का झालो याचा खुलासाही केला.
महाराष्ट्रात आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फुटली तेव्हा फडणवीस हेच लक्ष्य राहिले. त्याला उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं. ‘एकतर तू राहशील ना मी राहीन’. मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला करत त्यांची कारकीर्द संपवण्याची धमकी दिली. शरद पवारांनी त्यांना ‘अनाजी पंत’ म्हणत त्यांच्या जातीची खिल्ली उडवली होती. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर विरोधकांनी उपहासात्मक टिप्पणी केली. दोन पक्ष फोडून त्यांना एकत्र आणल्याची टीका त्यांच्यावर झाली. थोडक्यात ते टीकेचे केंद्र बनले. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना तोंड दिले. त्यांनी संयम राखला. लोकसभेतील पराभवानंतरही त्यांनी संयम राखला आणि आपल्या चाली आणि रणनीती अतिशय चोखपणे राबवून विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
महायुतीच्या अकल्पनीय विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे असल्याचे मानले जात असले तरी त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. कारण महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी असे आणखी दोन घटक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचे पोस्टर्स नागपुरात लागले आहेत. भाजप कार्यकर्त्यांचीही तीच भावना असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत. फडणवीस यांनी आपल्या राजकीय आचरणात नेहमीच संघाची शिस्त पाळली असून, राजकीय फायद्या-तोट्याची चिंता न करता फडणवीस यांनी आपण संघाचे स्वयंसेवक असल्याची वस्तुस्थिती कधीही लपवून ठेवली नाही. फडणवीस अनेकदा संघाच्या कार्यक्रमात उघडपणे सहभागी होतात. विजयादशमीच्या संघाच्या उत्सवात ते संघाच्या पूर्ण गणवेशात सहभागी होतात. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने त्यांचा संघाच्या सर्व स्तरांपासून, सरसंघचालकांपासून खालच्या स्तरापर्यंत थेट संवाद आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटनांनी भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले. या काळात देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख पातळ्यांवर संघाच्या थेट संपर्कात होते. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता आणि राजकीय फायदा-तोट्याची पर्वा न करता हिंदुत्वाच्या मूळ विचाराशी संघाची बांधिलकी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील विकास, हिंदुत्व आणि सर्व जातींना सोबत घेऊन सरकार चालवण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्ये अधिक आहे.
– नरसिंग कांबळे, मुख्य संपादक ‘महाराष्ट्र मिशन’



