एनटीएत मोठी खाडाखड; ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ करत केंद्र सरकार ॲक्शन मोडवर!

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (एनटीए) कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारे खेळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून संस्थेतील तब्बल ४७ अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आले असून, आगामी काळात आणखी काही दोषी घटकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीएच्या एकूणच कामकाज पद्धतीत मुळापासून सुधारणा घडवून आणली जात आहे. ही कारवाई केवळ अधिकारी बदलण्यापुरती सीमित नसून, संपूर्ण यंत्रणेची पुनर्रचना केली जाणार आहे. परीक्षा पद्धतीमधील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करून संस्थेचे नवे आणि पारदर्शक स्वरूप लवकरात लवकर समोर आणले जाईल.
येत्या महिनाभरात या सर्व फेरबदलांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः, परीक्षा आयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या ‘आउटसोर्सिंग’ सेवांच्या नियमांमध्ये कडक सुधारणा करण्यात येत आहेत. यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजनांच्या आधारेच ही नवीन नियमावली तयार केली जात असून, यामुळे भविष्यातील गैरप्रकारांना मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



