नवी दिल्ली

दिल्लीत धावत्या बसमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी जेरबंद!

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घर सोडल्यानंतर नोएडाला जात असताना रस्ता चुकलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर रिकाम्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची नराधमी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप या दोन्ही आरोपींना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली बसही जप्त करण्यात आली आहे.

पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी असून ती अकरावी इयत्तेत शिकत आहे. घरच्या रागारागात ती कोणालाही न सांगता नोएडातील चुलत भावाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील ‘परी चौक’ येथे उतरली. त्याच वेळी तिथून एक रिकामी स्लीपर बस जात होती. तिने बस थांबवल्यानंतर चालक आणि वाहकाने तिला नोएडा सेक्टर-६३ येथे सोडण्याचे सांगून बसमध्ये बसवले. मात्र, बस सुरू झाल्यानंतर वाहकाने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

परी चौक ते काश्मिरी गेटदरम्यान बसने सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नराधम चालकाने आणि वाहकाने बसमध्येच अल्पवयीन मुलीवर आलटून-पालटून सामूहिक बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. रात्री उशिरा आरोपींनी पीडितेला काश्मिरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर रस्त्यावर सोडून पळ काढला.

घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने थेट काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधून घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी प्रसंगावधन दाखवत गुन्हा दाखल केला आणि तिमारपूर येथील बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. बसची फॉरेन्सिक तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. राजधानीतील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page