उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळी पाऊस आणि वीज कोसळून ८९ जणांचा मृत्यू; भदोहीला सर्वाधिक फटका

लखनौ : उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसाने आणि वीज पडण्याच्या घटनांनी ८९ जणांचा बळी घेतला आहे. या आपत्तीमध्ये ५० हून अधिक नागरिक जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात घरांचे आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे.
भदोही आणि प्रयागराजला सर्वाधिक फटका
मिळालेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक तडाखा भदोही आणि प्रयागराज जिल्ह्यांना बसला आहे. भदोहीमध्ये वादळ आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर प्रयागराजमध्ये १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय फतेहपूरमध्ये ९, बदायूंमध्ये ५, प्रतापगडमध्ये ४ आणि इतर जिल्ह्यांमध्येही जीवितहानीची नोंद झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर नुकसान
बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या या धुळीच्या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, तर घरांच्या भिंती आणि छपरे कोसळल्याने अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले. पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कलाही मोठा फटका बसला आहे. वीज कोसळल्याने केवळ मानवी हानीच नाही, तर १०० हून अधिक पशुधनाचाही मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतीची घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत कार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. बाधितांना २४ तासांच्या आत आर्थिक मदत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. महसूल आणि कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सोपवण्यात आले असून प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने येत्या काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



