महाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रीयसामाजिक

शिवसेना नेमकी कुणाची? पक्ष आणि चिन्ह कुणाला? ; सुनावणी ऑगस्टमध्ये 

पालिका निवडणुकांआधीच 'सुप्रीम'चा निकाल होणार ?

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी कोर्टाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.

याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे यांच्या वकिलांनी २ जुलैला खंडपीठासमोर केली होती. त्यावर सोमवारी कोर्टात युक्तीवाद होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यात प्रकरणावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप त्यांनी तारीख निश्चित केलेली नाही. सोमवारच्या सुनावणीदरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायची आहे, असे विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. निवडणुकांआधी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागू शकतो. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या २०२२ मधील बंडानंतर फेब्रुवारी २०२३ मध्येच शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते. त्याला ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून अजूनही त्यावर निकाल झालेला नाही.

निवडणुकांआधी अंतरिम निकाल देण्याची मागणी ठाकरे यांनी याचिकेत केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच नावावर आणि चिन्हावर लढवल्या गेल्या आहेत, असा युक्तीवाद केला आहे. सुप्रीम कोर्टाने आधीही याबाबतची ठाकरेंची याचिका फेटाळली आहे, असेही वकिलांकडून निदर्शनास आणून दिले जात आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात कुणाला दिलासा मिळणार, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page