मॉस्कोमध्ये आयसीसचा दहशतवादी हल्ला ६० जणांचा मृत्यू ; १०० हून अधिक जण जखमी

नवी दिल्ली : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
रशियन मीडियानुसार, मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये कॉन्सर्ट सुरू असताना दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी हॉलमध्ये स्फोटकांचा स्फोटही केला, त्यामुळे तेथे आग लागली. हल्ल्यानंतर विशेष पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली.
आयसीसने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन ते चार बंदुकधारींनी एकाच वेळी लोकांवर गोळीबार सुरू केला, ज्यात किमान ६० लोक ठार झाले. पोलिसांचे पथक लोकांना बाहेर काढण्यात आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात व्यस्त आहे.
आपत्कालीन सेवा मंत्रालयाने सांगितले की गोळीबारानंतर सुमारे १०० लोक थिएटरच्या तळघरातून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर इतर छतावर लपले. निवेदनात म्हटले आहे की रॉक बँडच्या सर्व सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
रशियन मीडियानुसार, हल्लेखोरांनी स्फोटकांचाही वापर केला, ज्यामुळे हॉलमध्ये स्फोट झाला आणि मोठी आग लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इमारतीतून प्रचंड धूर निघताना दिसत आहे. क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात किमान ६० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १०० लोक जखमी झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, दहशतवाद्यांनी शेकडो लोकांना बंधकही बनवले आहे. मात्र, ओलीसांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे.रशियाने गोळीबाराच्या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या घटनेचा निषेध करत हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मॉस्कोच्या महापौरांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर मॉस्कोमधील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रशियन एजन्सींनी मॉस्कोमधील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली आहे.



