लेख

‘महाराष्ट्र मिशन’ लेख : छापे घालताना पोलिसांकडून पुरेशी दक्षता हवी

पुणे शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून छुप्या पद्धतीने पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याचे चित्र आहे. नियंत्रण कक्षाला माहिती येऊन देखील तिथे असे काही मिळून आले नाही, असा रिपोर्ट दिला जातो. परंतु, हद्दीत धंदे सुरूच असतात. एका बड्या क्लबची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा कारवाईसाठी गेली असता भितीने उड्या मारून पळून जाताना एकाचा मृत्यू झाला. अशाच एका घटनेत यापूर्वी सुध्दा एकाचा जीव गेला होता. या अशा घटनांविषयी कोणीही आवाज उठवत नाही.‌ जुगारासारख्या किरकोळ सामाजिक गुन्ह्यांमध्ये पोलीस कारवाईच्या वेळी एखाद्याचा जीव जात असेल तर ती घटना गंभीर मानली पाहिजे.

जुगार अड्ड्याची माहिती मिळाल्यानंतर नाना पेठेत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारत पळ काढत असताना एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा प्रकार घडला. ब्रायन रुडॉल्फ गिअर (५२, रा. बाणेर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला नाना पेठेतील क्राईस्ट चर्चसमोर लाजवंती कॉम्प्लेक्स या ठिकाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते. तेव्हा दार बंद होते. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा ठोठावला. एकाने दरवाजा उघडला; मात्र लोखंडी दरवाजा उघडला नाही. पोलीस समोर उभे असल्याचे दिसताच त्याने दार लावून घेत पोलिस आले, असा आवाज दिला व एकच गोंधळ उडाला. फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता. त्यामुळे चांगलीच पळापळ झाली.

फ्लॅटमध्ये असलेल्या जुगाऱ्यांनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. काहींनी इमारतीच्या पाइपवरून घसरत पळ काढला तर काहींनी उड्या मारल्या. त्यात ब्रायन याने उडी मारल्यानंतर त्याला गंभीर मार लागला. त्याचा एक पाय फॅक्चर झाला. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वी सिंहगड रोड परिसरात पोलीस कारवाईसाठी गेले असता इमारतीवरून उड्या मारून जात असताना एकाचा मृत्यू झाला होता. ठाण्याच्या बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्याने म्हणे पोलीस वायरलेस गाडीत पोलिसांचे रिव्हाॅल्वर खेचून गोळ्या झाडल्या. पोलिसांनी उलट हल्ला करून त्याच्या थेट डोक्यात गोळी झाडली. या संशयास्पद चकमकी विषयी विरोधी पक्षांनी सरकारला जसे धारेवर धरले तसेच न्यायालयाने सुध्दा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.‌ संबंधित आरोपी पेक्षाही क्रूर गुन्हेगार मोकाट आहेत, त्यांचे एन्काऊंटर होत नाही आणि बलात्काराच्या घटनेनंतर सरकारची बेअब्रू होते म्हणून एखाद्या आरोपीचा कायदेशीर खून केला जातो,हे कोणालाच पटणारे नाही.

गुन्हेगारीसोबत त्याला पोषक असलेल्या जुगार अड्डे, मटका तसेच अवैध धंद्यावर देखील त्यांनी हात टाकत, बंद करण्याचे आदेश दिले. अचानक झाडाझडतीने चांगला धाक बसला. शहरात आयुक्तांच्या आदेशानंतरही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैध धंदे अन् त्याला अभय देणाऱ्यांना दणका दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरात कोयता गॅंगचा उपद्रव सुध्दा आटोक्यात आला. अशा परिस्थितीत पोलीस दलावर बालंट येईल असे प्रकार थांबले पाहिजेत. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतातच. परंतु एखाद्या धाडीच्या, छाप्याच्या आधी पोलीस पथकांनी कारवाईचे परिणाम काय होऊ शकतात याचाही विचार करुन आखणी केली पाहिजे.‌ तसे प्रशिक्षण त्यांना दिले जात असते, तसे दिले जात नसेल तर यापुढे दक्षता घेतली पाहिजे.

सामाजिक सुरक्षा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला धाव घ्यावी लागते. ठाण्यांच्या हद्दीत बेकायदा धंदे राजरोसपणे आणि उजळ माथ्याने सुरू असल्याचे दिसून येते. या धंद्यांकडे स्थानिक पोलिसांचा काणा डोळा होत आहे. त्यामुळे पोलिस ठाणी, चौक्यांपासून काही अंतरावर चालणाऱ्या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाला धाव घ्यावी लागते.

पोलीस ठाण्यांचे दुर्लक्ष असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने तीन महिन्यांत १५ बेकायदा धंद्यांवर कारवाई केली.‌ आजपर्यंत शेकडो छापे टाकून कारवाया केल्या मात्र या सर्व कारवाईत आरोपींना खरचटले सुध्दा नाही. दोन कारवायांमुळे मात्र दोन जीव गेले. कारवाई करताना नियोजनबद्ध रचना केली गेली पाहिजे. आरोपी कुठून पसार होऊ शकतात, त्यांच्या संभाव्य हालचाली काय असू शकतात याचाही अभ्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page