अग्रलेख: पोलीसांना ८ तास ड्युटीचे गाजर

पोलिसाची नोकरी म्हटली की त्याला वेळेचे बंधन नसते. अनेकदा बंदोबस्त, सण-उत्सव यांच्यावेळेस पोलिसांना घड्याळाकडे न पाहाता आपले कर्तव्य बजावावे लागते. ज्यादा तास काम करण्याचा पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. पोलिसांना उच्च रक्तदाब, मानसिक ताण, निद्रानाश, थकवा, श्वसनाचे विकार इत्यादी आजार आढळतात.
देशात ७३ टक्के पोलीस कोणत्या ना कोणत्या मानसिक, शारीरिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करतात. यात अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वच असतात. देशात ३७ टक्के पोलीस याच वेतनावर दुसरी नोकरी मिळाली तर ती करण्यास तयार आहेत. दिल्लीत तर गेल्या १० वर्षांत एक हजार पोलिसांनी स्वेच्छानिवृत्ती, व्हीआरएस घेतली. ७०० जणांनी नोकरीचा राजीनामा दिला. ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’नुसार, देशभरात पोलिसांची २२ टक्के पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा ताण सेवेत असलेल्या पोलिसांवर येतो. देशात एक पोलीस सरासरी रोज १४ तास कामावर असतो. अधिकारी सरासरी १५ तास, तर महिला पोलिसांची सरासरी १३ तास आहे. अोडिशात हे काम ८ तास, पंजाबात १७ तास होते.
महाराष्ट्रात जवळपास तीन लाख पोलीस कर्मचारी आहेत. यात सुमारे ३० टक्के जणांना मधुमेह, रक्तदाब व हृदयाचे आजार आहेत.
महिला पोलिसांना तर ज्यादा तास काम करावे लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते. सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो. वेळीअवेळी जेवण , पुरेशी झोप नसल्यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. सतत उन्हात उभे राहिल्यामुळे डोकेदुखी बळावते. वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागतात. अनेकदा ही दुखणी अनाठायी काळजीमुळे निर्माण झालेली असतात.
कोरोनाच्या भीतीखाली संपूर्ण जनता लॉकडाऊनमुळे घरी बसून होती. परंतू, पोलीस रस्त्यावर होते. पोलिसांना त्यांच्या कुटुंबाला एरवीही वेळ देता येत नाही. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला एकमेकांकडून मानसिक आधाराची गरज असते.
सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेकदा महिला पोलीस ८ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती.
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ अमरावती आणि नवी मुंबई पोलिसांनीही असा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला. संपूर्ण राज्य पोलीस दलातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय जाहीर झाला. प्रत्यक्षात ८ तासांऐवजी १२ तासच काम करावे लागते अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी खूप त्रस्त आहेत. आठ-आठ तासांचे गाजर काही महिने दाखवून पुन्हा ‘जैसे थे’चा कारभार पोलीस दलात सुरूच झाला आहे. काही ठिकाणी वरिष्ठ ऐकत नाहीत.
नोकरीची वेळ निश्चित नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पोलिसांवरील ताणाचा मुद्दादेखील पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला. दुसरीकडे मुंबई पोलिसांना आठ तास ड्युटी या योजनेची अंमलबजावणी सात वर्षांनंतरही केली जात नसल्याने पोलिसांमध्ये नाराजी वाढली आहे. मुंबईतील सुरक्षेसह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. रोजच्या कर्तव्याचे तास निश्चित नसल्याने कामाचा तणाव वाढत आहे. प्रकृतीचे आजार बळावले की त्यातून पोलिसांमध्ये नैराश्य येते. त्यातून काही जण व्यसनांना जवळ करतात. सिगारेट दारू, तंबाखूसारख्या व्यसनामुळे आरोग्याचे अधिक बिकट प्रश्न निर्माण होतात.
दुसरीकडे, दिवसेंदिवस सामाजिक अशांतता वाढत असून राजकीय, सामाजिक मोर्चे, आंदोलने यांना तोंड देता देता पोलीस मेटाकुटीला आले आहेत. वाढत्या गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस झटावे लागते.त्यातच व्हीआयपी बंदोबस्तासाठी अनेक तास रस्त्यावर थांबून राहावे लागते. पुण्यासारख्या शहरात वाहतूक कोंडी हा ज्वलंत विषय असल्याने त्यासाठी सुध्दा पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागते.
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना बनविल्या असल्या तरी त्या कागदावरच असल्याची परिस्थिती आहे. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहण्यासाठीच्या कृती कार्यक्रमाची प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे पाहायला मिळते.एकीकडे बदल्या, नियुक्त्यांमधील वशिलेबाजी आणि अवेळी ड्युटीमुळे त्रासल्या गेलेल्या पोलिसांना कौटुंबिक समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे वाढत्या मानसिक ताणामुळे पोलिसांच्या आत्महत्या आणि अन्य गैरकृत्यांचे प्रकार वाढत आहेत.
काश्मिरमध्ये पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीसह नक्षलग्रस्त भागात अशा प्रकारच्या नेमणूका केल्या जातात. परंतू, उर्वरीत महाराष्ट्रात या पर्यायाचा फारसा वापर झालेला नाही. तो आता केला गेला पाहिजे आणि पोलिसांवरचा कामाचा ताण कमी केला पाहिजे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांना सुट्या मिळाव्यात यासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास त्याचा फायदा होईल. यामधून एक चांगली पध्दत अस्तित्वात येऊ शकते.


