नगरच्या ‘सौंदाळा’ गावाने केली जातमुक्ती; आपली गावे, शहरे कधी धडा घेणार ?
शिव्या बंदीचाही ठराव करून माता-भगिनींचा सन्मान

महाराष्ट्र मिशन/विशेष वृत्त
मुंबई : अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव विधायक उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. सौंदाळा ग्रामपंचायत ने गाव जातमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गावाने नुकताच विशेष ग्रामसभेत हा ठराव केला. याच गावाने माता-भगिनींचा सन्मान राखण्यासाठी गेल्या वर्षी गावात शिव्या देण्यास बंदी घातली आहे. या शिव्या बंदी उपक्रमाची महाराष्ट्रात अन्य गावे सुध्दा अंमलबजावणी करु लागली आहेत. संतांच्या ‘भेदाभेद अमंगळ’ या संदेशाचा वसा घेऊन सौंदाळा गावात जात, पंथ, धर्म, वंश भेदभाव केला जात नाही. सर्व नागरिक समान आहेत. ‘माझी जात मानव’ ही भावना सामूहिकपणे स्वीकारली आहे.
सौंदळा गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसे फलक लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर याचा प्रसार करण्यात आला आहे. शासनाच्या समता व न्यायव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ही १८०० आहे. हे गाव तंटामुक्त गाव आहे.
ग्रामसभेत इतर देखील अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले. त्यामुळे सौंदाळा ग्रामपंचायत ही ते चर्चेचा विषय ठरली आहे. गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि गावचे सरपंच विविध उपक्रम गावात राबवत असतात. पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी योजना आणल्या जातात. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सौंदळा गावातील सरपंच शरदराव अरगडे पाटील यांनी एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला. गाव जात मुक्त आणि शिव्या मुक्त होण्यामुळे कल विरहित शांततेचा अनुभव येऊ लागला आहे.
सध्या जात-धर्मात सतत वादंग होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर, गाव होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्रता, समता, बंधुता अंगीकार करण्यासाठी जातमुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंच शरद आरगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘जातमुक्त’ गावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामपद्धती गाव सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी; तसेच सार्वजनिक हिताचा विषय घेण्याचा अधिकार आहे. अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला.
आता काय होणार?
गावात जात, पंथ, धर्म, वंश भेदभाव केला जात नाही. सर्व नागरिक समान आहेत. ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारली गेली. आंतरजातीय विवाह होतील, सर्व मदत केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता पाळली गेल्यास सामाजिक सर्वाधिकारानुसार ग्रामसभा/ग्राम पंचायत तत्काळ तपासेल.
शिव्या द्याल तर ५०० रूपये दंड
सौंदाळा ग्रामपंचायतीने जर कोणी शिवा दिली तर त्याला ५०० रूपयांचा दंड केला जाईल, असा निर्णय सुध्दा घेतला आहे. कारण नसताना आई बहिणी वरुन शिव्या दिल्या जातात. आई बहीणींची चूक नसताना लैंगिक अपशब्द वापरले जातात. यासाठी हा प्रतिबंध करण्यात आला आहे.
छोटे मोठे भांडण झाल्यावर माता भगिनींचा पुरुष उध्दार करतात. काही संबंध नसताना अनेकदा शिव्यांचा माध्यमातून महिलांना अपमानित केले जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत प्रकरण जातात. त्यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केला.
गावात शिव्या देणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, त्यामुळे शिव्या देणे थांबले असून त्याचे सकारात्मक परिणाम गावात दिसू लागले आहेत.. महाराष्ट्र शासनाने देखील राज्यभरात शिव्या बंदीचा कायदा आणून माता-भगिनींचा सन्मान करावा अशी मागणी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी केली आहे. आरगडे यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे
‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेतून राष्ट्रगीत
ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आलेल्या भोंग्यावर सकाळी ठीक १० वाजता राष्ट्रगीत लागल्यानंतर शेतात काम करणारे तसेच रस्त्याने जाणारे नागरिकांच्या कानावर राष्ट्रगीत ऐकू येताच जिथे असतील तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करतात. ग्रामपंचायतीने ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला आहे.
शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होईल: शरदराव आरगडे
सरपंच शरदराव आरगडे पाटील स्वतः पदवीधर असून पुरोगामी, कम्युनिस्ट विचारसरणीचे पाठीराखे आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्र मिशन’ ला सांगितले की शिव्या बंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील गावांमध्ये असा निर्णय घेतला जावा यासाठी आम्ही ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आमच्या गावाची प्रेरणा घेऊन शिव्या बंदीचा ठराव करण्यात येत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. गाव जातमुक्त करण्याचा निर्णय आम्ही ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेतला. रक्तदान शिबीर त्याच दिवशी राबवले. या जातमुक्त गाव निर्णयाचेही विधायक परिणाम दिसून येतील. महाराष्ट्रातील सर्व गावांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तर शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल.



