पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी

पुणे : कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर मकोका अतंर्गत कारवाईतून सुटून परदेशात फरार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आता पोलिसांनी निलेश घायवळ याच्या पुण्यातील कोथरूड परिसरातील घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे.
पोलिसांनी या छापेमारीत निलेश घायवळ यांच्या दोन घरांची झाडाझडती केली. यावेळी त्यांच्या घरातून जिवंत काडतुसे आढळून आले.
निलेश घायवळ सध्या परदेशात फरार असल्याने पोलिसांनी त्याच्या पुण्यातील घरावर कारवाई केली आहे. याआधी पुणे पोलिसांच्या पथकाने निलेश घायवळ यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरावरही छापेमारी केली होती. पोलिसांच्या या कारवाईमागे त्याच्याविरोधातील तपास अधिक गतीने पुढे नेण्याचा उद्देश असल्याचे समजते
पोलिसांनी घरातील सर्व खोल्या आणि घराजवळच्या परिसराची सविस्तर पाहणी केली. या छापेमारीत निलेश घायवळ याच्याशी संबंधित महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे आणि संशयास्पद सामग्री मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्याविरोधात चालू असलेल्या तपासामध्ये या वस्तूंचा महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या मते, निलेश घायवळ याची फरारी असूनही त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. पुणे पोलिसांचे पथक सतत त्याच्या हालचालींचा मागोवा घेत असून, त्याला लवकर अटक करण्यासाठी सर्व शक्यतो उपाययोजना राबवत आहे.



