उच्च न्यायालयाच्या गेट समोरच आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना न्यायालय परिसरात घडल्याने अनेकांची भंबेरी उडाली. घटनेनंतर उपस्थितांनी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेत कोटने तसेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सावंत यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे ५० ते ६० टक्के भाजल्याचे समजते.
कोकणातील एका जागेच्या वादातून ही घटना झाली असल्याचे समजते. एका वकिलाला या प्रकरणात प्रकाश सावंत यांनी एकूण ६ लाख ८० हजार रुपये दिले होते. यापैकी ६ लाख रुपये वकिलाने परत केले असून उर्वरित ८० हजार रुपये देण्यास वकिलाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता.
या आर्थिक वादातूनच सावंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



