
होजई : सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आसामच्या होजई जिल्ह्यातून जात असताना ७ हत्तींना धडकली. या अपघातात ७ हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या अपघातावेळी सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसचे इंजीनसह पाच डब्बे रूळावरून घसरले. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
नॉर्थ-इस्ट फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की हा अपघात पहाटे २ वाजून १७ मिनिटांनी झाला असून हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सैरंग, ऐझवाल भागाला नवी दिल्लीशी जोडते.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटना निवारणासाठी विशेष रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली असून, विभागीय मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले. उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच लुमडिंगचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.



