विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावर भाजपचे आमदार राहुल सुरेश नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आमदार आशिष शेलार, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आमदार चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. सभागृहात मांडलेल्या प्रस्तावास एकमताने संमती मिळाल्याने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.
भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. अध्यक्षपदासाठी त्यांची निवड बिनविरोध होणार, हे निश्चित होते कारण राहुल नार्वेकर वगळता इतर कुणीही या पदासाठी अर्ज भरलेला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपादासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला होता. सभागृहात राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांच्या कार्याविषयी विश्वास व्यक्त केला.



