
पुणे : तब्बल चार वर्षांनंतर सोमवारी पुणे शहराला महापौर व उपमहापौर मिळाले. महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने या दोन्ही पदांवर मंजुषा नागपुरे आणि परशुराम वाडेकर हे भाजपचेच उमेदवार विजयी झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडूनउमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ११९ नगरसेवक निवडून आले आहेत, तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चे ३ आणि शिवसेना (उबाठा) १ असे संख्याबळ आहे. महापौरपदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेविका मंजूषा नागपुरे, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.
तर, राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी शीतल सांवत, तर उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट, काँग्रेसकडून अश्विनी लांडगे व साहिल केदारी यांनी अर्ज भरले होते. महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे दोन्ही पदांवर भाजपचा विजय निश्चित आहे. मात्र, तरीही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू होते. त्याला यश आले.



