धक्कादायक! सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर वस्तू फेकली, सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. वृत्तानुसार, त्या व्यक्तीने न्यायालयात घोषणाबाजी देखील केली. नंतर सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला बाहेर काढले, ज्यामुळे काही काळ न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आला.
‘लाईव्ह लॉ’ वेबसाइटनुसार, न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, संबंधिताने ‘हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’, अशी घोषणा देत होता. काही प्रत्यक्षदर्शींनी वेबसाइटला सांगितले की, संबंधित व्यक्तीने सरन्यायाधीशांवर ‘बूट’ फेकण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी सांगितले की ,सरन्यायाधीशांवर कागदाचा गुंडाळा फेकण्यात आला. असाही दावा करण्यात आला की तो माणूस वकिलाच्या पोशाखात होता.
कोर्टरुममध्ये नेमकं काय घडलं? वकिलाची कुंडली आली समोर
सुप्रीम कोर्टात सोमवारी एका प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर हे सरन्यायाधीशांजवळ पोहोचले. त्यानंतर संधी मिळताच वकील राकेशन किशोरने सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या दिशेने बूट फेकला. मात्र, वकील राकेशचा बूट सरन्यायाधीश गवईंपर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर त्याने ओरडत सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी केली.
राकेश किशोरच्या कृत्यानंतर कोर्टातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने वकील राकेश किशोरला ताब्यात घेतलं. या वकिलाला तातडीने कोर्टाच्या बाहेर नेण्यात आलं. राकेश किशोरच्या कृत्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कोर्टात वकिलांना सुनावणी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश गवई यांनी वकिलांना पुढे सांगितलं की, ‘तुम्ही या गोष्टीने विचलित होऊ नका. मला या गोष्टीने कोणताही फरक पडत नाही’.
कोणत्या कलमांखाली होऊ शकते कारवाई?
जो कोणी कोर्टची मर्यादा तोडतो, अपमानास्पद वर्तन करतो किंवा न्यायिक प्रक्रियेत अडथळा आणतो, त्याच्यावर थेट कारवाई करता येते. अशा घटनांसाठी Contempt of Courts Act, १९७१ अंतर्गत कारवाई केली जाते. संविधानातील कलम १२९ नुसार सुप्रीम कोर्टला स्वतःच्या अवमानाशी संबंधित प्रकरणांमध्ये थेट कार्यवाही करण्याचा अधिकार आहे.



