आमिर मामा तिसऱ्यांदा बोहल्यावर! वयाची साठी उलटली तरी ‘लव्हस्टोरी’ फिट; गौरीसोबत थाटात उरकला संसार

मुंबई : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘आमिर मामा तिसऱ्यांदा बोहल्यावर’ चढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये ज्याची उत्सुकता होती, ती बातमी अखेर खरी ठरली आहे. आमिर खानने आपली दीर्घकाळाची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी अगदी खाजगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली आहे.
कुटुंबीयांच्या साक्षीने पार पडला विवाह
हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. यात फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. विशेष म्हणजे, आमिरच्या आधीच्या लग्नांमधील मुलेही या सोहळ्याला उपस्थित राहून वडिलांच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाच्या सुरुवातीला आनंदाने सहभागी झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये आमिर आणि गौरी लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत, तर त्यांच्या मध्ये गौरीचा मुलगा आणि बाजूला आमिरचा मुलगा उभा असल्याचे दिसत आहे. आमिर आणि गौरी दोघेही या नव्या प्रवासात अतिशय आनंदी दिसत आहेत.
२०२४ मध्ये झाली होती नात्याची सुरुवात
आमिर आणि गौरी यांच्या नात्याची चर्चा २०२४ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला वर्षभर त्यांनी लाँग-डिस्टन्स रिलेशनशिप जपली. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवशी आमिरने स्वतः अधिकृतपणे गौरी ही आपली जीवनसाथी असल्याचे जाहीर केले होते. आता लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आमिर खानचा विवाह प्रवास
◾पहिले लग्न: रीना दत्ता (१९८६ – २००६)
◾दुसरे लग्न: किरण राव (२००५ – २०२१)
◾आता: गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्या इनिंगला सुरुवात.
वयाची साठी उलटली असली तरी आमिर खानची ‘लव्हस्टोरी’ अजूनही तितकीच फिट असल्याचे दिसून येत आहे. आमिर खानच्या आयुष्यातील या नवीन वळणावर त्याचे चाहते प्रचंड आनंदी असून, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला त्याच्या नवीन संसारिक आयुष्यासाठी सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
चाहत्यांचा कल्ला! आमिर मामांच्या लग्नावर नेटकऱ्यांची तुफान ‘फटाकेबाजी’
आमिर मामा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर जणू मिम्सचा पाऊस पडला आहे! ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने आयुष्याच्या साठीत ‘परफेक्ट’ खेळी खेळली, अशी चर्चा रंगली आहे. एका चाहत्याने तर चक्क कमेंट केलीय, ‘मामा, तुम्ही तर सिरीयल नंबर लावल्यासारखे लग्न करताय, पण आमचं काय?’ तर काही खोडकर नेटकऱ्यांनी ‘आमिर मामांचं टायमिंग आजही एकदम कडक आहे’ असं म्हणत त्यांच्या फिटनेसचं आणि जिद्दीचं कौतुक केलंय. फोटोमध्ये आमिर आणि गौरी दोघेही आनंदी दिसत असले तरी, नेटकऱ्यांचे लक्ष मात्र त्यांच्या ‘लग्नकार्यातील’ मुलांकडे जास्त आहे. एकूणच, आमिर खानच्या या ‘तिसऱ्या अंकाने’ नेटकऱ्यांच्या डिजिटल कट्ट्यावर एकच हशा पिकवला असून, चाहत्यांना आता या ‘सुपरहिट शो’च्या पुढच्या भागाची (म्हणजेच सुखी संसाराची) ओढ लागली आहे!



