
नाशिक : भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातला रुपाली चाकणकर यांनी १७७ कॉल्स तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ कॉल्स केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात शिजुका आणि नॉडी या कार्टून कॅरेक्टर्सची नावे घेत मोठा दावा केला जात आहे. या नावाने काही नंबर मास्क करण्यात आले असून शिजुका , नॉडीचे सर्वाधिक कॉल्स या अशोक खरातला गेल्याचे दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.
या मास्क नंबरमागील व्यक्ती कोण आहेत याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. तसेच आपण ही सगळी माहिती पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते यांनाही दिली असल्याचे दमानियांनी म्हटले आहे.
यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणात मी शोध घेतेच आहे. सध्या माझा फोकस १८ नोव्हेंबर २०२५ या दिवसावर आहे. अजितदादांच्या घराबाहेर जी काळी जादू किंवा करणी केली गेली त्यात कुणाकुणाचे फोन कॉल्स आले? ते शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. या सगळ्यात प्रतिभा चाकणकर यांचा रोल काय आहे तेदेखील मी शोधत आहे. शिवाय शिजूका नॉडी नावाचा एक नंबर आहे त्यावरुन सर्वाधिक फोन आलेत. त्याचाही शोध मी घेण्याचा प्रयत्न करते आहे.
त्या पुढे म्हणाल्या, रुपाली चाकणकरांनी अशोक खरातला १७७ कॉल केले आहेत. एकनाथ शिंदेंनी १७ कॉल केले आहेत, यामध्ये काय बोलणे झाले? त्याचे तपशील समोर आले पाहिजेत ही माझी मागणी आहे. दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांनीही कॉल केले होते. कुणालाही चौकशीचे समन्स बजावण्यात आलेले नाही. प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले गेले पण १७७ कॉल करणाऱ्या रुपाली चाकणकर यांना अजून समन्स का नाही? जे काही फोन कॉल आले आहेत त्यात समताला पाठवलेले गेलेले मेसेजही आहेत. पैशांचे व्यवहार कसे झाले? काय काय घडले ते समोर आले पाहिजे.
शिजुका आणि नॉडीच्या कनेक्शनबद्दल अंजली दमानिया म्हणाल्या, मला कार्टून कॅरेक्टरचे नाव दिसले. अशोक खरातने वेगवेगळी नावे देऊन फोन मास्क केले होते. त्याचा उलगडा व्हायला पाहिजे असे मला वाटते. यामागे नक्कीच मोठे मासे आहेत असे दिसून येते आहे. कारण मोठ्या प्रमाणावर कॉल्स, इनकमिंग, आऊटगोईंग आणि मेसेज आहेत त्याची माहिती मी पोलिसांना देते आहे असेही अंजली दमानिया यांनी म्हटलेय. आता या नावांचा खुलासा समोर येणार का? हे पाहणेही महत्त्वाचे असून. मास्क नंबर कुणाचे? ते मास्क का करण्यात आले? या प्रश्नांचीही उत्तरे मिळणार आहेत.



