नाशिक टीसीएस प्रकरण: पाचही आरोपींना अटींवर जामीन मंजूर

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीमधील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील पाचही आरोपींना नाशिक न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाले असून तपास जवळपास पूर्ण झाला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित विनायक खरकर यांनी रझा रफीक मेमन, आसिफ आफताब अन्सारी, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, शफी भिकन शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार या आरोपींच्या जामीन अर्जांना मंजुरी दिली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांना धमकावतील किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करतील, अशी कोणतीही गंभीर शक्यता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायालयाच्या अटी आणि शर्ती
◾खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आरोपींनी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक राहील.
◾आरोपींना तक्रारदार महिलेच्या कार्यस्थळाजवळ किंवा राहत्या परिसरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
◾तसेच, तक्रारदार, साक्षीदार किंवा प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यासही न्यायालयाने मज्जाव केला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी व टीसीएसची भूमिका
दरम्यान, टीसीएस नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा कथित लैंगिक छळ, सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळाशी संबंधित एकूण नऊ गुन्ह्यांचा विशेष तपास पथक कसून तपास करत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, टीसीएस मध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा सक्तीविरोधात ‘शून्य सहनशीलता’ हे कडक धोरण अवलंबले जाते. या प्रकरणातील लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये नाव आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना कंपनीने यापूर्वीच निलंबित केले आहे. न्यायालयाच्या या नवीन निर्णयानंतर आता कायदेशीर लढाईला नवे वळण मिळाले आहे.



