एसआयआर’ हा ‘एआय’चा वापर करून केलेला मोठा घोटाळा
ममता बॅनर्जींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले असून या दोघांनी एकत्रितपणे ‘एआय’ चा वापर करून एसआयआर हा मोठा घोटाळा केला असल्याचे म्हंटले आहे.
बांकुरा जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआर ही केवळ सामान्य प्रक्रिया नाही, तर याद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्याचे काम केले जात आहे. मतदार यादीतून सुमारे ९० लाख नावे हटवण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असून भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले असून ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे सांगत त्यांनी हा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “एसआयआर हा खूप मोठा घोटाळा असून भाजपला सत्तेत आणण्याचे हे षड्यंत्र आहे. यानुसार मतदारांची नावे वगळण्याचे राजकारण सुरू आहे.”



