लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा !

लातूर, संग्राम म्हेत्रे : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, जिथे १५० उंबऱ्यांचे छोटेसे गाव आहे, तेथे १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या दाव्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणाने गावातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबादने वक्फ याचिका क्रमांक १७/२०२४ अन्वये या जमिनींवर दावा केला आहे. या दाव्यानुसार, तळेगावातील १०३ शेतकऱ्यांना न्यायालयाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वकिलांच्या मदतीने याचिकेला उत्तर दिले आहे. तथापि, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून यावर येत्या २० डिसेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे.
अनेक पिढ्यान पिढ्यांपासून या जमिनींवर शेतकरी आपली उपजीविका करत आहेत. अचानक वक्फ बोर्डाच्या नोटीसा आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जमिनी गेल्या तर कुटुंब कसे चालवणार?” हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
तळेगावमधील वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे सरकार काळात वक्फ बोर्डाला दिल्या गेलेल्या निधीच्या जीआरवरून राजकीय वाद निर्माण झाला होता. हा जीआर प्रशासकीय चूक असल्याचे सांगून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तो मागे घेतला होता. मात्र, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
गावातील शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या जमिनीचे न्यायालयीन संरक्षण करण्याची मागणी केली आहे. “शंभर-दीडशे वर्षांपासून आमच्याकडे असलेल्या जमिनींवर जर अचानक असा दावा केला जात असेल, तर तो आमच्यासाठी मोठा धक्का आहे,” असे शेतकऱ्यांनी सांगितले. आता गाव कायदेशीर लढाईसाठी सज्ज झाले आहे, परंतु त्यांच्या मनातील भीती मात्र अद्याप कायम आहे.
शेतकऱ्यांनी दिला इशारा
वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतक-यांनी सांगितले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
वक्फ म्हणजे काय?
अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असे म्हटले जाते. ही संपत्ती स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही स्वरूपात असू शकते. दरम्यान एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते. या मालमत्तेचा वापर सामान्यत: शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो.



