बाकावर उभं राहून अंधश्रद्धेचे धडे! कोट्यवधींचं साम्राज्य उभा करणाऱ्या प्राध्यापकाचा विज्ञानाला काळिमा फासणारा कारनामा!

लातूर (विशेष प्रतिनिधी) : विज्ञानाची पंढरी आणि शिक्षणाचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमधून एक धक्कादायक आणि विज्ञानाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. स्वतःला केमिस्ट्रीचा (रसायनशास्त्र) तज्ज्ञ आणि विज्ञानाचा प्राध्यापक म्हणवून घेणारा शिवराज मोटेगावकर चक्क वर्गातील बाकांवर उभा राहून विद्यार्थ्यांवर अंधश्रद्धेचे पाणी शिंपडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विज्ञानाचा प्राध्यापक की अंधश्रद्धाळू मांत्रिक?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, शिवराज मोटेगावकर हा चक्क विद्यार्थ्यांच्या बाकांवरून चालताना दिसत आहे. त्याच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात काही पाने आहेत. एखाद्या मांत्रिकाप्रमाणे तो तांब्यातील पाणी समोर बसलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर शिंपडत आहे. अंधश्रद्धेची सीमा ओलांडत तो विद्यार्थ्यांना सांगत आहे की, “तुम्ही सर्वजण एम्स (AIIMS) मध्ये प्रवेश मिळवणार आहात, असा योग कित्येक वर्षांनंतर आला आहे.” मेडिकल प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवण्याऐवजी, हा प्राध्यापक अशा प्रकारे अंधश्रद्धेचे डोस पाजत असल्याचा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
‘फोटॉन’ बॅच आणि पैशांची लूट!
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभा करणाऱ्या या प्राध्यापकाची मोठी दहशत होती. नामांकित आणि श्रीमंत डॉक्टरांच्या मुलांसाठी तो ‘फोटॉन’ नावाची एक विशेष व्हीआयपी बॅच चालवत असे. धक्कादायक बाब म्हणजे, या बॅचचे शुल्क विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नाही, तर त्यांचे पालक किती मोठे डॉक्टर आहेत आणि त्यांची आर्थिक पत किती आहे, यावरून ठरवले जात होते. पालकांकडून लाखो रुपयांची लूट करून अशा प्रकारे विज्ञानाचा गळा घोटला जात असल्याचे आता उघड झाले आहे.
लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ
केमिस्ट्री उत्तम शिकवणारा हा शिक्षक स्वतः मात्र कमालीचा अंधश्रद्धाळू आणि ढोंगी निघाला, यावर आता सर्वसामान्य नागरिक आणि पुरोगामी संघटनांनी सवाल उपस्थित केले आहेत. कष्टाने आणि बुद्धीने ‘एम्स’चे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना असल्या भाकडकथा सांगून दिशाभूल करणाऱ्या या प्राध्यापकावर कठोर कारवाई होणार का? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या प्रकाराची दखल घेणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



