लातूर

श्रद्धेचा बाजार मांडणारा ‘पिस्तुल्या’ जेरबंद; ३.६५ कोटींच्या अपहारात महाराजांचा मुखवटा फाटला!

लातूरच्या खंडापूर येथील ३ कोटी ६५ लाखांच्या देणगी अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भक्तीच्या नावाखाली भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत."

लातूर : लातूर तालुक्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात झालेल्या तब्बल ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी, किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ ‘किशोर महाराज’ शिवणीकर (पिस्तुल्या महाराज), याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नाट्यमयरीत्या अटक केली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ‘पिस्तुल्या’च्या अटकेमुळे खंडापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

खंडापूर येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवासाठी भाविक व देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्यात आला होता. मात्र, या उत्सवातील ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणात ‘पिस्तुल्या महाराज’ याच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता.

नाट्यमय कारवाई आणि अटक:

स्थानिक गुन्हे शाखेला किशोर महाराज ऊर्फ ‘पिस्तुल्या’ लातूर शहरातील मोतीनगर परिसरात लपल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचला, तेव्हा आरोपीने स्वतःला राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर कोंडून घेतले आणि बाहेरून कुलूप लावून घेतल्याचा बनाव केला. पोलिसांनी सतर्कता दाखवत घराची झडती घेतली. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना अखेर बळाचा वापर करून दरवाजा तोडावा लागला. तब्बल दोन तासांच्या थरारानंतर पोलिसांनी ‘पिस्तुल्या महाराजां’ना ताब्यात घेतले.

पुढील तपास सुरू:

मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे या प्रकरणातील गुपिते उघड होण्याची शक्यता आहे. ३ कोटी ६५ लाखांच्या या अपहारात आणखी कोणाकोणाचा हात आहे आणि हा निधी नेमका कुठे वळवण्यात आला, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे धार्मिक उत्सवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page