माहिती युद्धाच्या काळात पत्रकार आणि प्रसारमाध्यमांची भूमिका ही राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन

पुणे : राष्ट्रीय सुरक्षा आणि पत्रकारिता हे दोन वेगळे विषय वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेले आहेत. देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षित राष्ट्र जितके आवश्यक आहे, तितकीच मुक्त, जबाबदार आणि सजग प्रसारमाध्यमेही आवश्यक आहेत. माहिती युद्ध, डीपफेक, एआय आधारित चुकीची माहिती आणि सोशल मीडियावरील अफवांच्या या युगात पत्रकारांनी जबाबदारी, संयम, सत्यता पडताळणी, लवचिकता आणि प्रजासत्ताक मूल्ये या ‘5 आर’ सूत्राचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. लष्कर आणि माध्यमांनी एकमेकांकडे संशयाने नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी परस्पर विश्वास, समन्वय आणि जबाबदारीच्या भावनेतून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान’ कार्यक्रमात ते ‘राष्ट्रीय सुरक्षा व माध्यमांची भूमिका’ या विषयावर बोलत होते. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
आजचे युद्ध केवळ सीमांवर लढले जात नाही
सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना जनरल पांडे म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. पारंपरिक युद्धासोबतच आता हायब्रीड वॉरफेअर, नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर आणि माहितीच्या आघाडीवरील युद्ध अधिक प्रभावी झाले आहे. समाजामध्ये अविश्वास, भीती आणि तणाव निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती, डीपफेक व्हिडीओ, फेरफार केलेली छायाचित्रे आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा वापर केला जात आहे.
त्यांनी सांगितले की, आज लष्करी मोहिमांच्या केंद्रस्थानी ‘इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स’ आले आहेत. एखादी चुकीची माहितीही राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकते. माहितीची पोकळी निर्माण झाली तर ती अफवांनी भरली जाते.
पत्कारांसाठी ‘5 आर’ सूत्र
लष्करी कारवायांचे किंवा संवेदनशील घटनांचे वार्तांकन करताना पत्रकारांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पत्रकारांसाठी ‘5 आर’ सूत्र मांडले :
जबाबदारी : माहिती देताना सामाजिक आणि राष्ट्रीय परिणाम लक्षात घेणे. संयम- संवेदनशील घटनांमध्ये सनसनाटीपणा टाळणे. सत्यता पडताळणी- माहितीची खातरजमा करूनच प्रसारित करणे. लवचिकता – बदलत्या परिस्थितीत शांतपणे आणि सक्षमपणे काम करणे.
प्रजासत्ताक मूल्ये – लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय हित जपणे.



