बेंगळुरूच्या दगडखाणीत काळाचा घाला: ४० फूट उंचावरून खडक कोसळून ७ मजुरांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज गुरुवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली आहे. बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील मदपट्टणा परिसरातील एका स्टोन क्रशर प्रकल्पात (दगड खाण) काम सुरू असताना सुमारे ४० फूट उंचीवरून एक अजस्त्र खडक कोसळल्याने ७ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मजुरांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या वेळी खाणीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. यावेळी खाणीत एकूण १८ मजूर कार्यरत होते. अचानक वरच्या भागातील ४० फूट उंचीवरील मोठा खडक कोसळल्याने खाली काम करणाऱ्या मजुरांना पळण्याची संधीच मिळाली नाही. खडक अंगावर पडल्यामुळे ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये स्थलांतरित मजुरांचा समावेश
दुर्घटनेत बळी पडलेले मजूर हे मुख्यत्वे बिहार आणि आसाम राज्यातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रशासनाकडून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथक उपचार करत आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही मजूर अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ही दुर्घटना नैसर्गिक की मानवनिर्मित, याचा तपास पोलीस करत आहेत. दगड खाणीमध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात होते का? मशिनरी किंवा खोदकामात काही तांत्रिक त्रुटी होत्या का? आणि मालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? या सर्व बाजूंची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांनी प्रशासनाकडून मागितले आहे.



