तुकाराम मुंढेंचा बडगा सौंदर्य प्रसाधनांवरही; निकृष्ट व घातक कॉस्मेटिक्सवर एफडीएची मोठी कारवाई!

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांवर कारवाईचा बडगा उगळल्यानंतर, आता अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सौंदर्य प्रसाधनांवरही (Cosmetics) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. राज्यभरात विकल्या जाणाऱ्या अनेक प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा (Mercury) आणि शिशाचे (Lead) प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे तपासात समोर आल्यानंतर एफडीएने ही कारवाई हाती घेतली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांवर आणि उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही सर्व उत्पादने निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट करत त्यांची विक्री तातडीने थांबवण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. सौंदर्य प्रसाधनांमध्ये असणाऱ्या पारा आणि शिसे यांसारख्या घातक घटकांमुळे त्वचेची जळजळ होणे, त्वचेवर लालसरपणा व पुरळ उठणे, तसेच त्वचा पातळ होण्यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अज्ञाताकडून किंवा अनधिकृत ठिकाणांहून उत्पादने खरेदी न करता, केवळ परवानाधारक आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच सौंदर्य प्रसाधने खरेदी करावीत, असे आवाहन एफडीएच्या वतीने करण्यात आले आहे.



