राष्ट्रीय

पंजाबमध्ये मोठा घातपात टळला! पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ‘बीकेआय’च्या दहशतवाद्याला बेड्या; मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत

चंदीगड / जालंधर : सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’द्वारे संचलित केल्या जाणाऱ्या एका धोकादायक दहशतवादी जाळ्याचा पंजाब पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. काउंटर इंटेलिजन्स जालंधर आणि जालंधर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत प्रतिबंधित संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (BKI) शी संबंधित एका संशयित दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे पंजाबमधील मोठा घातपात टळल्याचे मानले जात आहे.

पोलिसांनी जालंधर परिसरातून या दहशतवाद्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून सुमारे १.३ किलोग्राम वजनाचे उच्च स्फोटकांनी सुसज्ज असलेले एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) जप्त करण्यात आले आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोखंडी गोळ्या आणि बॉल बेअरिंग्जचा वापर करण्यात आला होता. यावरून आरोपी राज्यात मोठा आणि रक्तरंजित हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्या स्पष्ट होते. सुरक्षा यंत्रणांच्या वेळेस आणि सतर्कतेमुळे राज्याची शांतता धोक्यात आणणारा हा कट ऐनवेळी उधळला गेला असून, अनेकांचे प्राण वाचले आहेत.

प्राथमिक तपासात हे संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल परदेशात बसलेल्या कुख्यात हँडलर्सच्या थेट इशाऱ्यावर काम करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जालंधर ग्रामीण भागातील पतारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), स्फोटक पदार्थ अधिनियम तसेच शस्त्र कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे मूळ लागेबांधे, त्याचे सहकारी आणि या कटामागील इतर म्होरक्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page