बीड

तुझं कॅरेक्टर खराब करेन” म्हणणाऱ्या पोलिसाचं स्वतःच ‘कॅरेक्टर’ डागाळलं; १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!

बीड: “तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देणाऱ्या नेकनूर पोलीस ठाण्यातील अंमलदाराचे स्वतःचे ‘कॅरेक्टर’ लाचखोरीमुळे डागाळले आहे. अपघातात मयत झालेल्या वडिलांच्या विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत याला रंगेहात पकडले आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदाराचे वडील एका अपघातात मयत झाले होते. या अपघाताच्या केसमध्ये विम्याचा दावा करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस ठाण्याकडून काही कागदपत्रे हवी होती. या कागदपत्रांसाठी तक्रारदाराने वारंवार विनंती केली, मात्र नेकनूर पोलीस ठाण्यातील अंमलदार दत्तात्रय बळवंत याने यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत जालना एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार, आज सापळा रचून तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बळवंतला रंगेहात पकडण्यात आले.

अंमलदार आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात

दत्तात्रय बळवंत याच्यावर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पवनचक्की लाईनच्या कामावरून एका शेतकऱ्याच्या मुलाला “तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता पुन्हा एकदा लाचखोरीच्या प्रकरणात तो अडकल्याने नेकनूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहे.

सद्यस्थितीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page