एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदत; परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : एसटी बस प्रवासात राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना अद्याप स्मार्ट कार्ड प्रत्यक्ष हातात मिळाले नसल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या वतीने ‘अमृत ज्येष्ठ नागरिकांना’ मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते, तर सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटीच्या तिकिट दरामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने मिळवून देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी यासाठी १ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक प्रवाशांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात कार्ड अद्याप हातात न आल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.
केवळ स्मार्ट कार्ड वेळेत हातात पडले नाही म्हणून पात्र प्रवाशांना शासनाच्या हक्काच्या सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, याची गांभीर्याने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यात लक्ष घालून मुदतवाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अद्याप स्मार्ट कार्ड न मिळालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वाढवून मिळालेल्या या कालावधीचा सदुपयोग करून पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर आपली स्मार्ट कार्ड मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांच्या वतीने करण्यात आले आहे.



