मुंबई

अँटिलिया स्फोटक अन् मनसुख हिरेन हत्या प्रकरण; सचिन वाझे, प्रदीप शर्मासह १० जणांवर आरोप निश्चित!

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष ‘एनआयए’ (NIA) न्यायालयाने या हायप्रोफाईल प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांवर अधिकृतरीत्या आरोप निश्चित केले आहेत.

 पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा

तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता या प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आरोपींनी यापूर्वी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज (आरोपांमधून वगळण्याबाबतचे अर्ज) आणि विविध कायदेशीर प्रक्रिया अडकून पडल्यामुळे मागील पाच वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून सर्व आरोपींविरुद्ध ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा’ (UAPA) तसेच भारतीय दंड संहितेतील (IPC) हत्या, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर अत्यंत गंभीर कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत.

नेमकी घटना काय होती

दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक बेवारस स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले होते. या गाडीची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या २० कांड्या आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाशी जोडलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडले होते. आता या प्रकरणातील आरोप निश्चितीची पायरी पार पडल्यामुळे लवकरच साक्षीदारांची साक्ष, पुराव्यांची नोंद आणि न्यायालयीन कामकाजाला वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page