सोलापूर

चिंचोळी एमआयडीसीतील बनावट दारूच्या कारखान्यावर छापा; तब्बल अडीच कोटींचे स्पिरीट व साहित्य जप्त

मोहोळ / सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरात बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या एका मोठ्या अवैध कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक धाड टाकून सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत २९ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

कारवाईची पार्श्वभूमी आणि गोडाऊनचा पर्दाफाश

गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चिंचोळी एमआयडीसीतील एका सिमेंट कंपाउंड असलेल्या गोडाऊनवर छापा टाकला. बाहेरून बंदिस्त असलेल्या या गोडाऊनमध्ये ‘टॅंगो पंच’ आणि ‘भिंगरी’ या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघड झाले. औद्योगिक वसाहतीचा गैरवापर करून सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर बनावट मद्याचा पुरवठा केला जात होता. या अवैध निर्मितीमुळे सुमारे ७० लाख ४० हजार रुपयांच्या शासकीय महसुलाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अधिकारी वर्ग आणि पुढील तपास

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सौरभ अदाटे, जे. एन. पाटील, ए. व्ही. घाटगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्या १५ वर्षांच्या सेवाकाळातील ही अत्यंत मोठी कारवाई आहे. या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील (विशेषतः बिहारमधील) असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोडाऊन भाड्याने देणाऱ्या मालकालाही सह-आरोपी करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यात यापूर्वी जप्त केलेल्या बनावट दारू प्रकरणाशी या रॅकेटचा काही संबंध आहे का, स्प्रिटचा पुरवठा नेमका कुणी केला आणि यामागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा सखोल तपास आता उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. चिंचोळी एमआयडीसीत यापूर्वीही ड्रग्ज आणि अवैध धंद्यांचे प्रकार उघडकीस आल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page