सोलापूर

ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर एमपीडीएची कारवाई; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (३७, रा. अर्धनारी, ता. मोहोळ) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या १७ सप्टेंबरच्या आदेशानुसार त्यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कारवाईचे आदेश झाल्यानंतर शरद कोळी काही काळ पोलिसांच्या हाती लागले नव्हते. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध घेत सांगली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रविवारी कडक पोलिस बंदोबस्तात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शरद कोळी यांच्यावर खंडणी मागणे, धमकी देणे, मारहाण, वाळू चोरी व तस्करी यांसह सुमारे नऊ गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणांची पार्श्वभूमी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम लक्षात घेऊन एमपीडीए कायद्याच्या कलम ३(१) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आक्रमक नेते म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या स्थानबद्धतेच्या कारवाईनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धता ही प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई असून, या कारवाईनंतर शरद कोळी यांना वर्षभर येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page