शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढा तालुक्यात ‘स्वाभिमानी’चे रास्ता रोको आंदोलन

सोलापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून तीव्र विरोध सुरू झाला आहे. हा महामार्ग विद्यमान पालखी महामार्ग आणि पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी नाहक संपादित केल्या जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
संघटनेचे मुख्य नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी माढा तालुक्यातील अरण येथे पुणे-सोलापूर महामार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
“आधीच अस्तित्वात असलेल्या दोन मोठ्या महामार्गांना समांतर तिसरा महामार्ग कशासाठी? यामुळे माढ्यातील सुपीक शेती नष्ट होणार असून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव आहे,” असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.



