पंचतारांकित हॉटेलच्या झगमगाटाआड वेश्याव्यवसायाचा संशयास्पद धंदा! पुण्यात दोन महिलांची सुटका
आलिशान हॉटेलमध्ये एजंटांमार्फत महिलांना व्यवसायासाठी आणल्याचा प्रकार उघड | चौघांविरुद्ध गुन्हा दाखल | शहरातील अन्य हॉटेल्सचीही तपासणी करण्याची गरज

पुणे : शहरातील आलिशान हॉटेल्सच्या झगमगाटाआड नेमके काय सुरू आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. संगमवाडी परिसरातील बंडगार्डन रोडवरील हॉटेल क्राऊन प्लाझामध्ये एजंटांमार्फत महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आला. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत हॉटेलवर छापा टाकला आणि परराज्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला या हॉटेलमध्ये एजंटांच्या माध्यमातून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत दोन महिलांची सुटका केली. या महिला मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असल्याचे समोर आले आहे
या प्रकरणी रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४) आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ४ आणि ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील अन्य हॉटेल्सचीही तपासणी होणार का?
या एका कारवाईने पुण्यातील हॉटेल व्यवसायाच्या झगमगाटाआड सुरू असलेल्या संभाव्य गैरप्रकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये आलिशान हॉटेल्स, लॉज आणि सर्व्हिस अपार्टमेंटच्या माध्यमातून अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू आहेत का, याची व्यापक तपासणी होण्याची गरज आहे. ऑनलाइन बुकिंग, एजंटांचे जाळे आणि हॉटेलमधील खोल्यांचा वापर यांची पोलिसांनी स्वतंत्रपणे पडताळणी केल्यास अशा प्रकारांना आळा घालण्यास मदत होऊ शकते.
एका हॉटेलवरील कारवाईपुरतीच ही मोहीम मर्यादित न राहता शहरातील संशयास्पद ठिकाणांचीही चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आलिशान हॉटेलच्या नावाखाली जर मानवी तस्करी किंवा महिलांचे शोषण होत असेल, तर अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.



